विष्णू कर्णमलापासून निर्माण झालेल्या शुंभ व निशुंभ दैत्यांनी त्रिलोकी उच्छाद मांडला होता तेव्हा त्यांचा संहार करण्यासाठी सर्व देवगण व ऋषीगणांनी आदिमाया शक्तीची विविध वाद्यांच्या नाद सुरामध्ये आळवणी केली, अर्थात गोंधळ घातला. तेव्हापासून हिंदू धर्मीयांमध्ये गोंधळाची परंपरा सुरु झाली, महाराष्ट्रा मध्ये याची खूप मोठी परंपरा आहे. विशेषत: तुळजाभवनी आणि रेणुकामाता या देवींच्या संदर्भात गोंधळ घालण्याची पिढीजात परंपरा आहे. कालांतराने अन्य देवींच्या बाबतीतही गोंधळ घालण्याची प्रथा सुरु झाली.
अंगात तेलकट झबला, कपाळावर कुंकू, गळ्यात देवींची प्रतिमा, गळ्यात कवड्यांची माळ अशा वेशभूषेत आपल्या दारावर आलेली व्यक्ती म्हणजे गोंधळी. अंबेमातेच्या जयजयकार करीत ही व्यक्ती संबळ आणि तुणतुणे या वाद्यांच्या साहाय्याने विविध देवींचे गाणे सादर करतो. संबळाच्या तालावर नृत्यही करतो. त्याला 'संबळ गोंधळ' म्हणतात. तर काही गोंधळी काकडे पेटवून गोंधळ घालतात. ज्याला 'काकडा गोंधळ' असे म्हटले जाते. देवीचा गुणगान गाणारा तो गोंधळी.
आजही कोणत्याही शुभकार्याअगोदर जवळपास सर्व समाजात कुलस्वामिनीला प्रसन्न करण्यासाठी गोंधळ घालण्याची परंपरा आहे. हा धार्मिकविधी सादर करताना निरनिराळ्या देवतांना गोंधळी गोंधळाला येण्याचे गाण्यातूनच आवाहन करतात. ज्याठिकाणी गोंधळ घालावयाचा आहे त्या ठिकाणी पाटावर स्वच्छ वस्त्र अंथरून अष्टदल काढले जाते अथवा धान्याच्या राशीवर श्रीफळासह कलश मांडून उसाच्या किंवा ज्वारीच्या पाच ताटांचा मांडव तयार केला जातो व त्याला पुष्प माळा बांधली जाते. याला गोंधळाचा चौक असे म्हणतात. दिवटे पेटवतात, दिवटी हातात घेऊन संबळाच्या तालावर गीत आणि नृत्य सादर करतात. हे ऐकताना विशेष आनंद होतो.
तुळजापूर भवानी आई गोंधळाला यावं...
कोल्हापूर अंबाबाई गोंधळाला यावं ...
गोंधळ मांडीला आई गोंधळाला यावं ....
कोल्हापूर अंबाबाई गोंधळाला यावं ...
गोंधळ मांडीला आई गोंधळाला यावं ....
कुलस्वामिनी, ग्रामदेवी, आराध्य दैवते अशा सर्व दैवतांना गोंधळावर येण्याचे आवाहन केल्यांनतर देवीचे स्तवन करणारी पदे म्हंटली जातात त्यानंतर देवीचा जोगवा मागितला जातो
अनादी निर्गुण प्रगटली भवानी
मोह महिषासूर मर्दना लागुनी
विविध तापाची करावया झाडणी
भक्ता लागी तू पावसी निर्वाणी
आईचा जोगवा जोगवा.... जोगवा मागीन
मोह महिषासूर मर्दना लागुनी
विविध तापाची करावया झाडणी
भक्ता लागी तू पावसी निर्वाणी
आईचा जोगवा जोगवा.... जोगवा मागीन
गोंधळयांकडे विवध वाद्ये असतात त्यापैकी संबळ हे सर्वात महत्वाचे वाद्य असून त्याच्या सोबतीला तुणतुणे व टाळही असतात. पूर्वीसारखा वेश परिधान करणारे गोंधळी फार थोडेच शिल्लक राहिले आहेत तर आता बदलत्या जमान्याप्रमाणे त्यांचा ही वेश बदलला आहे.